amit shah slams shivsena and mahavikas aghadi

मी कधीच बंद खोलीत चर्चा करत नाही, अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

महाराष्ट्र राजकारण

सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज (7 फेब्रुवारी) भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काय म्हणाले अमित शाह?

“सर्वात आधी मी या भूमीवर पाय ठेवून या मातीला स्पर्श करुन धन्य झालो. या भूमीकडून प्रचंड चेतना मिळते. कारण याच भूमीने संपूर्ण देशाला स्वदेशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी जीव देण्याचा संस्कार दिला आहे. जेव्हा मुघलांचं राज्य होतं, औरंगजेबाचं राज्य होतं, तेव्हा चहुबाजूने अंधार होता, कुठेही प्रकाशाचं चिन्ह दिसत नव्हतं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची भाषा करत संपूर्ण देशाला चेतना दिली. तेव्हापासून सुरु झालेली ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सुरु आहे. आता मोदींच्या नेतृत्वात भारताला विश्वात नाव कमवायचं आहे. शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारचे साहस केलं. त्यांनी हिंदवी साम्राज्याची स्थापना केली. अनेक पराक्रम केले. आपल्या जीवाची बाजी लावून ते स्वधर्मासाठी लढले. भारतात सर्वात आधी नौसेना बनवण्याचं काम शिवाजी महाराजांनी याच पवित्र भूमीत केलं”, असं अमित शाह म्हणाले.

“भाजप खासदार नारायण राणे यांच्या छवीचं अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेल, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेसाठी लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली. मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

अमित शाह यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात ऑटो रिक्षाची सरकार बनली, ज्याचे तीनही चाकं वेगवेगळ्या दिशेने चालत आहेत. एक पूर्व, दुसरा पश्चिम तर तिसरा वेगळ्या दिशेने चालतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या जनादेशाच्या विरोधात सत्तेच्या लालसेपोठी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आलं. जनादेश हा मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देणारा होता”, असा दावा त्यांनी केला.

“ते म्हणतात, एका बंद दाराआड खोलीत चर्चा झाली. मी वचन दिलेलं होतं. मी कधीच बंद खोलीत चर्चा करत नाही. जे आहे ते सर्व सार्वजनिक करतो. मी कधीच खोलीचं राजकारण केलं नाही. मी तसं कुठलंच वचन दिलं नाही”. “ते म्हणतात, आम्ही वचन मोडलं आहे. मी तुम्हाला आठवण करुन देतो, आम्ही तर शब्दाचे पक्के माणसं. अशाप्रकारे खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये नितीश कुमार यांना वचन दिलं होतं. त्यांनी जनादेशानुसार भाजपचा मुख्यमंत्री बसवा, असा आग्रह केला. पण आम्ही वचनाला पक्के होतो, आम्ही नितीश यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं”, असं अमित शाह म्हणाले.

“कलम ३७० हटवलं, घाबरत घाबरत म्हणतात आम्ही स्वागत करतो. राम मंदिर बनवण्याचा निर्णय होतो. तेव्हाही मी जाईल, जाणार नाही. काय झालं? आम्ही तर कधीच घाबरलो नाही. भाजपा सिद्धांतासाठी राजकारणात आलेली आहे. राजकारणासाठी सिद्धांत तयार करत नाही. मी शिवसेनेच्या मित्रांना सांगू इच्छितो की, तुम्ही सिद्धांतांसाठी आलेला नाहीत. बाळासाहेब गेले. आता राजकारणासाठी सिद्धांतांची तोडमोड सुरू आहे. पण, महाराष्ट्रातील जनतेला चांगलं माहिती आहे. मी इतकंच सांगू इच्छितो की, आम्ही तुमच्या रस्त्यावर चालणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमच्या पक्षाचं अस्तित्व राहिलं नसतं. तुम्ही मोदीजींच्या नावाने प्रचार केला. आम्ही त्यांच्यादेखत प्रचार केला. त्यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे म्हणालो. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत सोडून ते सत्तेवर बसले आहेत”, असा घणाघात त्यांनी केला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत