china consider corona as a biological weapon in 2015

धक्कादायक खुलासा : चीनकडून 2015 मध्येच ‘कोरोना विषाणू’ शस्त्र म्हणून वापरण्याचा विचार, अमेरिकेला मिळाले पुरावे

कोरोना ग्लोबल

बीजिंग : चीनच्या लष्करी वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूंचा वापर जैविक अस्त्र म्हणून करण्याचा विचार २०१५ मध्येच केला होता. कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्याच्या पाच वर्षे अगोदरच त्यांनी याबाबत चर्चा केली होती. तिसरे जागतिक महायुद्ध हे जैविक अस्त्रांचे असेल, असे भाकित देखील त्यावेळी चिनी वैज्ञानिकांनी केले होते अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला प्राप्त झालेल्या कागदपत्रात दिली आहे. विशेष म्हणजे, सायबर तज्ज्ञांनी या कागदपत्रांची शहानिशा केली असून ती कागदपत्रे खरी असल्याचं समोर आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘दी ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राने प्रथम प्रसारित केलेल्या कागदपत्राच्या आधारे ब्रिटनमधील ‘दी सन’ या वृत्तपत्राने ही माहिती दिली. अमेरिकी परराष्ट्र खात्याने ही कागदपत्रे मिळवली असून त्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या कमांडर्सनी कोरोना विषाणूंचा वापर जैविक युद्धासाठी करता येईल असे म्हटले होते. अमेरिकी अधिकाऱ्यांनी मिळवलेली सदर कागदपत्रे २०१५ च्या दरम्यान चीनच्या लष्करी वैज्ञानिकांनी तयार केली होती. कोविड १९ विषाणू कुठून आला हे शोधून काढण्याचे काम अमेरिकेने हाती घेतले आहे. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार चिनी वैज्ञानिकांनी सार्स कोरोना विषाणूंचे उदाहरण हे जनुकीय किंवा जैविक अस्त्र म्हणून त्यावेळी दिले होते. कोरोना विषाणूंमुळे माणसाला साध्या सर्दीपासून गंभीर श्वसन रोगापर्यंत अनेक व्याधी होतात. त्यात सार्सचाही समावेश आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या कागदपत्रातील संदर्भानुसार, जैविक अस्त्रांचा हल्ला केल्यास शत्रूची वैद्यकीय यंत्रणा कोलमडून पडेल असे सांगण्यात आले होते.

अमेरिकी हवाई दलाचे कर्नल मायकेल जे. ऐनकॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या कागदपत्रात जैविक अस्त्रांच्या मदतीने तिसऱ्या जागतिक महायुद्धाची शक्यता चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी २०१५ मध्ये वर्तवली होती. लष्कराने असे म्हटले होते की, २००३ मध्ये करोनाचा विषाणू सार्सच्या रूपाने चीनमध्ये आला होता. त्याची मानवनिर्मित आवृत्ती तयार केली तर ते चांगले जैविक अस्त्र ठरू शकेल व ते दहशतवाद्यांनाही मागे टाकील असा उल्लेख त्यात आहे. चीनच्या आरोग्य क्षेत्रातील अनेक बडय़ा व्यक्तींची नावे या कागदपत्रांच्या लेखकात असून या कागदपत्रांवर आधारित ‘व्हॉट रिअली हॅपन्ड इन वुहान’ हे पुस्तक बाजारात येणार आहे. या कागदपत्रांवर एकूण १८ लेखकांची नावे असून त्यातील काही वैज्ञानिक शस्त्रास्त्र तज्ज्ञ आहेत. चीनने सुरुवातीला २०१९ मध्ये वुहान शहरात पहिला करोना रुग्ण सापडल्याचे जाहीर केले. नंतर जागतिक आरोग्य संघटनेने ती महासाथ जाहीर केली.

ऑस्ट्रेलियाचे खासदार टॉम टय़ुगेंडाट व ऑस्ट्रेलियाचे राजकीय नेते जेम्स पॅटर्सन यांनी म्हटले आहे की, या कागदपत्रातला मजकूर काळजी करायला लावणारा असून कोविड १९ बाबत चीनची भूमिका पारदर्शक नसल्याचे स्पष्ट करणारा आहे. चीनला सुरुवातीपासूनच जैविक अस्त्रात स्वारस्य आहे व ते धोकादायक ठरले आहे. या कागदपत्रांनी चीनच्या आसुरी महत्त्वाकांक्षा उघड झाल्या असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जैविक अस्त्रांबाबत सल्ले देण्यात आले. ती जैविक अस्त्रे कशी तयार करता येतील याचीही माहिती दिली होती.

ही चीनची बदनामी असल्याचा चीनचा प्रत्यारोप

चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने ही बातमी चीनची बदनामी करण्यासाठी दिल्याचा आरोप केला आहे. जैविक दहशतवादाचा अभ्यास करण्याच्या हेतूने लिहिलेल्या क्रमिक पुस्तकासारखा हा तपशील असून त्याचा अर्थ चीनने कृत्रिम कोरोना विषाणू तयार केला असा लावण्यात आला आहे. यात चीनची बदनामी करण्याचा हेतू असल्याचे इस्ट चायना नार्मल युनिव्हर्सिटीचे संचालक व प्राध्यापक शेन हाँग यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियातील चीनविरोधी शक्ती आम्हाला बदनाम करण्यासाठी पत्रकारितेतील नीतिमूल्यांचे उल्लंघन करून कागदपत्रांचा चुकीचा अर्थ लावत आहेत, असं ते म्हटले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत