अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी तीव्र उन्हात फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, थकवा, मळमळ व ताप आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरु करावे, असे विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज सांगितले. तसेच उष्माघाताच्या रुग्णांना त्वरीत उपचार सोयी-सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.
शहरातील सामान्य रुग्णालय व वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला विभागीय आयुक्तांनी आज आकस्मिक भेट देऊन उष्माघाताच्या उपचारासंबंधी रुग्णालयातील सोई- सुविधांची पाहणी केली व त्याबाबत आढावा घेतला. यावेळी उपायुक्त संजय पवार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सरीता हजारे, डॉ.अकुश मानकर, डॉ. प्रिया सिंग आदी उपस्थित होते.
सामान्य रुग्णालय येथे पाहणी दरम्यान रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी आस्थेने विचारपूस केली. रुग्णालयात मिळणाऱ्या सोई-सुविधेविषयी त्यांनी दाखल रुग्णांशी संवाद साधला. रुग्णालयातील औषधांचा साठा, वैद्यकीय उपचार यंत्र, संसाधन, बाह्य व आंतर रुग्ण कक्षातील रुग्ण संख्या, वैद्यकीय उपकरणांची सद्यस्थिती, डॉक्टर्स व परिचारिकांची संख्या, वार्डातील रुग्णांची सद्यस्थिती, अतिदक्षता व ओपीडी कक्षातील सोयीसुविधा तसेच उष्माघाताच्या रुग्णांसाठी केलेल्या उपाययोजना संदर्भात विभागीय आयुक्तांनी माहिती जाणून घेतली. उष्माघाताच्या रुग्णांना तात्काळ व वेळेत वैद्यकीय सेवा पुरवावे. तसेच रुग्णालयात 24 तास विज पुरवठा उपलब्ध राहिल याची दक्षता रुग्णालय प्रशासनानी घ्यावी, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी दिल्या.
उष्माघात टाळण्यासाठी करावयाचे उपाययोजना
तहान लागली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावे. बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट व चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत न्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर करावा.
अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावी व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा, तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. पहाटेच्या वेळी जास्त जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
काय करू नये
लहान मुलांना बंद असलेले व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालू नये. बाहेरील तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी व उन्हात अतिकष्टाची कामे करू नये. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेट थंड पेय घेऊ नये.