पाटणा : पाटणा एम्स रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय, असं पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं आहे.
पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले की, रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्यात. निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, पण आता ती पुढे ढकलण्यात आली. साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुका तहकूब केल्यात आणि 15 दिवसांनंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल व निर्णय घेतला जाईल.
बिहारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. मंगळवारी पहिल्यांदाच 10,000 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यात कोरोनानं नवीन विक्रम केलाय. मंगळवारी राज्यात 10,455 कोरोनाबाधित सापडलेत. या दरम्यान 51 रुग्णांनाही आपला जीव गमवावा लागलाय, अशी माहिती बिहारच्या आरोग्य विभागाने दिली आहे.




