Nashik road dug up for optical fiber cable four months after construction; NCP corporator Hemlata Patil stops the work.
नाशिक महाराष्ट्र राजकारण

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांचा मुद्दा गाजल्यानंतरही रस्ते खोदण्याचे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे. सीबीएस ते कॅनडा कॉर्नर या मार्गावरील चार महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेला रस्ता स्मार्ट सिटी कंपनीकडून ‘ऑप्टिकल फायबर केबल’ टाकण्यासाठी पुन्हा फोडण्यात आला. कुलकर्णी गार्डन परिसरात सुरू असलेले हे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी तत्काळ बंद पाडले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पावसामुळे नाशिक शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या महासभेत स्मार्ट सिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’ला या परिस्थितीसाठी जबाबदार धरत ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले होते. महापालिकेच्या परवानगीशिवाय रस्ते फोडू नयेत, असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, महासभेला दोन दिवस उलटत नाहीत तोच चार महिन्यांपूर्वी तयार केलेला सिमेंटचा रस्ता ऑप्टिकल फायबर केबलसाठी फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला.

कुलकर्णी गार्डन येथे केबल टाकण्यासाठी सिमेंटच्या रस्त्याची तोडफोड सुरू असल्याची माहिती मिळताच डॉ. हेमलता पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत काम थांबवले. विशेष म्हणजे काम सुरू असताना स्मार्ट सिटी किंवा महापालिकेचा एकही अभियंता घटनास्थळी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. या कामासाठी कामगार धुळ्याहून आल्याची माहितीही समोर आली.

संबंधित ठेकेदार फिरोज यांच्याशी संपर्क साधला असता ते देवळाली येथे असल्याचे सांगण्यात आले. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी चेंबर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

डॉ. हेमलता पाटील यांचे प्रश्न
रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यापूर्वी सीसीटीव्ही चेंबर, केबल आणि अन्य सुविधांचे नियोजन का करण्यात आले नाही?
स्मार्ट सिटी आणि महापालिका यांच्यात समन्वयाचा अभाव आहे का?
चार महिन्यांतच नव्याने तयार केलेला रस्ता पुन्हा फोडण्याची वेळ का आली?
रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याचा खर्च नागरिकांच्या खिशातूनच जाणार का?
‘विकासकामांना विरोध नाही; नियोजनशून्य कामांना विरोध’

या प्रकाराची तातडीने चौकशी करून रस्ता फोडण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याची तपासणी करावी. लेखी परवानगीशिवाय सुरू असलेले काम तातडीने थांबवावे आणि फोडलेला काँक्रीट रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ववत करावा, अशी मागणी डॉ. हेमलता पाटील यांनी केली.

‘विकासकामांना आमचा विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली नियोजनशून्य कामे करून नागरिकांच्या पैशांचा अपव्यय करण्यास नक्कीच विरोध आहे,’ असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत