जॉर्जिया : जॉर्जियातील गुदौरीच्या एका रेस्टाँरंटमध्ये ११ भारतीयांचे मृतदेह आढळून आले आहेत. भारतीय दुतावासाने या घटनेबाबत पुष्टी दिली आहे. जॉर्जियातील अंतर्गत मंत्रालयाच्या प्राथमिक तपासात कोणाच्याही शरीरावर जखमेची कोणतीही खून आढळून आलेली नाही. जॉर्जियाच्या स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले की, कार्बन मोनोक्साइडच्या विषबाधेमुळे हा मृत्यू झाला आहे. सर्व मृत व्यक्ती एकाच भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करत होत्या, ज्यांचे मृतदेह दुसऱ्या मजल्यावरील बेडरुममध्ये आढळून आले आहेत.
भारतीय दुतावासाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, आम्हाला आताच एक दु:खद बातमी समजली की, ११ भारतीयांचा जॉर्जियातील गु्दौरी येथे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही सहवेदना व्यक्त करतो. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या घटनेची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्याही संपर्कात असून त्यांना पूर्णपणे सहकार्य करु.’
— India in Georgia (@IndEmbGeorgia) December 16, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्जियातील रेस्टॉरंटमधील स्लीपिंग क्वॉर्टर्सच्या बाजूच्या बंदिस्त जागेत पॉवर जनरेटर बसवण्यात आला होता, शुक्रवारी वीज खंडित होताच तो सुरु करण्यात आला. ज्यामुळे विषारी वायू तयार झाला आणि पसरला. ज्यामुळे तेथील भारतीयांना बाधा पोहोचली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, स्थानिक अधिकाऱ्यांच्या तपासात असा खुलासा झाला आहे. तर अधिकाऱ्यांनी मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक चाचणीचे आदेश दिले आहेत. भारतीय अधिकारी तपासासाठी त्यांचे पूर्ण सहकार्य देत आहेत आणि शक्य असेल त्या प्रकारे मदत करत आहेत.




