एकल पालकत्व स्वीकारलेल्या सरकारी सेवेतील पुरूष कर्मचाऱ्यांना देखील आता चाईल्डकेअर लीव्ह घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली. विधुर, घटस्फोटीत अथवा अविवाहित कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार असल्याचं जितेंद्र सिंह म्हणाले. हा मोठा निर्णय असून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यासंदर्भातील आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव सार्वजनिकरित्या हा निर्णय सर्वांपर्यंत पोहोचला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ज्या कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीत चाईल्डकेअर लीव्ह हवी आहे अशा कर्मचाऱ्यांची ती सुट्टी यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहे. तसंच कर्मचाऱ्यांना चाईल्ड केअर लीव्हवर असताना लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशनचा लाभही घेता येणार आहे.
पहिल्या वर्षात संपूर्ण चाईल्ड केअर लीव्ह ही भरपगारी रजा म्हणूनही वापरता येईल. तसंच दुसऱ्या वर्षी भरपगारी रजेच्या ८० टक्केच चाईल्ड केअर लीव्हच्या स्वरूपात वापरता येईल, असंही जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं. याव्यतिरिक्त दिव्यांग बालकांच्या देखभालीसाठीही नियम तयार करण्यात आले आहे. याअंतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणत्याही क्षणी चाईल्ड केअर लीव्हचा लाभ घेता येणार आहे.
जितेंद्र सिंह पुढे म्हणाले कि, “गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात सरकारनं अनेक सुधारणा करणारी पावलं उचलली आहेत. या नव्या सुधारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष रस दाखवला होता. त्यामुळेच काही महत्त्वाचे निर्णयही घेता आले. सरकारी कर्मचाऱ्यांनी उत्तमोत्तम काम करावं हा यामागील उद्देश आहे.”