नवी दिल्ली : लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात केवळ दोन दिवसांत कोविन या सरकारी पोर्टलवर ५० लाखांहून अधिक जणांनी नावनोंदणी केली आहे. लसीकरण मोहिमेचा वेग कायम राखण्यासाठी केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व खासगी रुग्णालयांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलं कि, कोणतंही खासगी रुग्णालय कोरोना लसीकरण केंद्र म्हणून काम करू शकेल.
मंत्रालयाकडून केंद्र आणि राज्य सरकारला लसीकरण मोहिमेत निर्धारित नियमांचं पालन करणाऱ्या आणि तीन आरोग्य योजनांच्या पॅनलमध्ये सहभागी असलेल्या सर्व खासगी रुग्णालयांच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी योजनांमध्ये आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, केंद्र सरकार आरोग्य योजना आणि राज्य आरोग्य विमा योजना यांचा समावेश आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लस देण्यासाठी आपल्याकडे आवश्यक कर्मचारी, लाभार्थ्यांच्या देखरेखीसाठी योग्य व्यवस्था, लसीच्या देखभालीसाठी कोल्ड चैन तसंच लस दिल्यानंतर प्रतिकूल परिणाम समोर आले तर त्यावर उपचार पुरवण्याची व्यवस्था असणं आवश्यक आहे.