मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन जनतेचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली.
राज्यात प्रश्न खूप आहेत. प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णया घेण्याची असं सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता आणि शिरीष सावंत आदी होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन 10 ते 15 मिनिटं चर्चा केली. राज्यपालांच्या भेटीनंतर राज यांनी माध्यमांशी संवाद साधून भेटीचं कारण उघड केलं.
पहिला विषय म्हणजे दुधाचे दर. दूध संकलन संस्था शेतकऱ्यांना लिटर मागे १७-१८ रुपये देऊन स्वतः भरघोस नफा मिळवतात. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ त्यात महागाई यात गुरांची देखभाल करणे देखील परवडत नाही, त्यामुळे दुधाला प्रतिलिटर २७ ते २८ रुपये मिळावेत, यात सरकारने लक्ष्य घालावे, अशी मागणी मनसेने केली आहे.
लॉकडाऊननंतर राज्यातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत आहे. ही बिले कमी व्हावीत आणि नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून राज्यात ठिकठिकाणी मनसेने आंदोलने केली. कंपन्या आणि सरकारचं एकमेकांकडे बोट दाखवणं सुरू आहे. या संदर्भात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशीही बोलणं झालं. लवकरात लवकर निर्णय घेऊ असं ते म्हणाले. हा विषय आज राज्यपालांच्या कानावर टाकला. त्यांनी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आम्ही पवारांशी बोलून चर्चा करू, असं राज म्हणाले.
वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली. pic.twitter.com/N6zSuYX9ed
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 29, 2020