कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाने 1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.
विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे; तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या असल्याच शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.
राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता समाजकल्याण मंत्री व आदिवासी मंत्री व कल्याण विभाग यांच्याशी चर्चा शिक्षणमंत्री करत असून याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
मध्यंतरी कोरोना नियंत्रणात येत असल्यामुळे राज्यामध्ये शाळा नोव्हेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू केल्या होत्या. सुरुवातीला इयत्ता नववी ते बारावी आणि नंतर इयत्ता पाचवी ते आठवी अशा शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून एक मार्चपासून शाळा काही काळासाठी बंद ठेवाव्यात अशी सूचना करण्यात आली आहे.




