मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्याने खळबळ उडाली आहे. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान, या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याची देखील माहिती मिळत आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे.
विशेष म्हणजे अंबानी यांच्या एका गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचं समोर आलं आहे. कारमध्ये जिलेटिनच्या 25 कांड्या असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्रालयाला संबंधित प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्रालयालाही याबाबत कळवण्यात आलं आहे. आता राज्य आणि केंद्रीय यंत्रणा या प्रकरणी तपास करणार असल्याचं कळतं. राज्य सरकारने मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाची विचारपूस करुन सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे.




