Amit Shah announcing the provision of 5 crore homes for citizens by 2029 under the PM Awas Yojana
देश पुणे महाराष्ट्र

मोठी बातमी : ५ कोटी लोकांना २०२९ पर्यंत हक्काचं घर; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा

पुणे: ‘‘सर्वांसाठी घरे’’ या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत केंद्रीय सरकारने २०२९ पर्यंत गरीब, गरजू, महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी, एसटी) यांतील पाच कोटी नागरिकांना हक्काचं घर देण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शनिवारी पुण्यात दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) च्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण आणि दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमात शहा बोलत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे आदी उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले, ‘‘घर नसलेल्या नागरिकांना हक्काचं घर, घरात शौचालय, मोफत वीज, उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये प्रत्येकाला घर, पाच लाख रुपयांपर्यंतचा विमा, पाच किलो धान्य, मोफत वीज आणि सिलिंडर दिले जातील. महिला, गरीब, अनुसूचित जाती आणि जमाती यांतील पाच कोटी नागरिकांना २०२९ पर्यंत घरे देण्याचा संकल्प मोदी सरकारने केला आहे. गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने ४ कोटी लोकांना वीज, १३ कोटी शौचालये, १ कोटी लखपती दीदी आणि ३६ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे.’’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, ‘‘देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा काम करत आहेत. गेल्या अडीच वर्षांत पंतप्रधान मोदींनी राज्याला आर्थिक मदत केली असून, गृहमंत्री शहा हे भक्कमपणे पाठिशी राहिल्याने अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. पीएम आवास योजनेसह म्हाडा, सिडको अशा विविध माध्यमांतून घरे देण्यात येत आहेत. याबरोबरच राज्यात लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण आणण्यात येणार आहे, ज्यामुळे परवडणारी घरे निर्माण होणार आहेत.’’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी ग्वाही दिली, ‘‘पीएम आवास योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात देशभरात दोन कोटी घरे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राला जास्तीत जास्त घरे मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.’’

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत