Shivsena activist Shyam Deshpande resign Shivsena party after Uddhav Thackeray criticized RSS

उद्धव ठाकरेंची संघावरील टीका मनाला क्लेश देऊन गेली, शिवसैनिक श्याम देशपांडे राजीनामा देताना काय म्हणाले? जाणून घ्या…

पुणे महाराष्ट्र

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी संघाच्या हिंदुत्वावरून काळ्या टोपीवरही प्रश्न उपस्थित केले. मात्र, संघावर केलेली टीका पुणे शहराचे माजी प्रमुख श्याम देशपांडे यांच्या जिव्हारी लागल्यानं त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

श्याम देशपांडे हे २००० ते २०१२ दरम्यान कोथरूडमधून शिवसेनेचे नगरसेवक होते. ते 2008 – ०९ दरम्यान महापालिकेच्या स्थायी समितीचेही अध्यक्ष होते. देशपांडे हे १९७२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत.

शिवसंपर्क अभियानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या बीकेसी मैदानात हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केल्या. ‘एखाद्या व्यक्तीनं भगवी टोपी घातली तर तो हिंदू बनतो, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टोपी काळी का?, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलं नाही. या चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठेही नव्हता, असा घणाघात ठाकरेंनी संघावर केला. मात्र, ही टीका जिव्हारी लागल्यानं पुण्यातील शिवसेना पदाधिकारी श्याम देशपांडे यांनी राजीनामा दिला आहे. देशपांडे यांनी याबाबत पत्रक सोमवारी प्रसिद्ध केले आहे.

देशपांडे यांनी पत्रकात म्हटले आहे की, “शिवसेना-भाजप युती तुटल्याने दु:ख आणि खंत शिवसैनिकांना आणि स्वंयसेवकांना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघावर केलेली टीका मनाला क्लेश देऊन गेली. भाजपच्या पूर्वीही संघ होता. संघाला राजकारणात ओढण्याचे काही गरज नव्हती, असे मला प्रामाणिकपणे वाटते. संघाला राजकारणात ओढून उद्धव साहेब आपण बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा पदर घट्ट धरला आहे, अशीच माझी भावना झाली आहे. तथापि संघानी मांडणी केलेल्या हिंदुत्वाच्या आक्रमकतेला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली योग्य दिशा आज आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अकारण राजकीय टीका करून भरकटली, असे खेदाने नमूद करावेसे वाटते. सरसंघचालक मोहन भागवत व अनेक संघ शिरस्थ नेत्यांना आपल्याबद्दल असणारे ममत्त्व आपण सत्तेसाठी विसरून कसे चालेल ? आपण राजकीय वादामध्ये संघाला अप्रत्यक्षपणे ओढून कॉंग्रेसचीच री ओढली आहे म्हणून मी आज शिवसेना पक्षाचे काम थांबवत आहे, जय महाराष्ट्र!”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत