Sameer Wankhede father Dnyandev Wankhede react to nawab maliks allegations

नवाब मलिक त्यांच्या जावयाला पकडल्यापासून मागे लागले, समीर वानखेडे यांच्या वडिलांचा संताप

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : क्रूझ पार्टी प्रकरणातील पंचाने अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान नवाब मलिक यांनी ट्वीटरवर समीर वानखेडे यांच्या एका प्रमाणपत्राचा जुना फोटो शेअर करत त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचे म्हटल्याने नवा वाद सुरु झाला आहे. याप्रकरणी आता समीर वानखेडे यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

समीर वानखेडे यांचे वडील म्हणाले कि, “माझं नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे आहे दाऊद नाही. हे कोणीतरी केले असेल किंवा लिहिले असेल, याच्याबद्दल माहिती नाही. पण माझे खरे नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे आहे. माझ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला, पदवीचे प्रमाणपत्र, पत्नीने हिंदू पद्धतीने लग्न केल्याचे प्रमाणपत्र आहे. त्यानंतरही प्रश्न कुठून उद्भवतात हे मला समजत नाही. हे सर्व खोटे आहे. कोणीतरी बनावट पद्धतीने हे केले आहे. सर्व कागदपत्रांवर मुलाचेही नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असेच आहे. समीर वानखेडेच्या पहिल्या पत्नीच्या मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावरही समीर ज्ञानदेव वानखेडे असाच उल्लेख आहे.” समीर वानखेडे यांच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

ज्ञानदेव वानखेडे पुढे म्हणाले कि, “नवाब मलिक हे त्यांच्या जावयाला पकडल्यापासून मागे लागले आहेत. सरकार त्यांचे असल्याने ते काहीही करु शकतात. माझ्याकडे पुरावे आहेत. त्यांनी समोर आणलेले प्रमाणपत्र हे खोटे की बनावट आहे हे मला माहित नाही.” समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबाबत ते म्हणाले की तो फोटो बरोबर आहे. नियमानुसार घटस्फोट देखील झाला आहे. त्यात काही चुकीचे नाही.

असे समीर वानखेडेंच्या वडिलांनी संताप व्यक्त करत म्हटले की हे प्रकरण संपल्यानंतर त्याला राजीनामा द्यायला सांगू. तो वकिल आहे. देशाची सेवा करण्याची जिद्द आहे म्हणून तो हे काम करत आहे. त्याच्यावर हल्ला झाला तरी हे सरकार काही करत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत