पारनेर : विखे घराण्याने कधीही राजकारणात सेटलमेंट केली नाही. आम्ही जनतेसाठी राजकारण करीत आहोत. सामान्य जनतेसाठी कितीही नुकसान झाले तरी काही फरक पडत नाही, कारण आमचे प्रपंच राजकारणावर चालत नाहीत. जिल्हयातील राजकीय नेत्यांना सेटलमेंटची सवय लागली आहे.” असा टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे. ते जिल्हा बॅंक निवडणुकीनिमित्त बोलत होते.
जिल्हा बॅंक निवडणुकीनिमित्त बिगरशेती मतदारसंघाचे उमेदवार दत्तात्रेय पानसरे आणि शिवसेनेचे सेवा संस्थेचे उमेदवार रामदास भोसले यांच्या प्रचार मेळाव्यात डॉ. विखे पाटील बोलत होते. यानिमित्त तालुक्यात जिल्हा बॅंकेसाठी भाजपचा शिवसेना उमेदवारास पाठिंबा असल्याचे जाहीर झाले. दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. इतर चार जागांसाठी उद्या मतदान होणार आहे.
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले कि, “जिल्हा बॅंकेत विखेंची माघार’ असे काही वृत्तपत्रांत आले. आम्ही पूर्वीच्या निवडणुकीतही माघार घेतली होती. माघारीचे काही वाटत नाही, कारण त्यातही काही तरी दडलेले असते.”
डॉ. विखे पाटील म्हणाले, “विखे घराण्याने कधीही राजकारणात सेटलमेंट केली नाही. आम्ही जनतेसाठी राजकारण करीत आहोत. सामान्य जनतेसाठी कितीही नुकसान झाले तरी काही फरक पडत नाही, कारण आमचे प्रपंच राजकारणावर चालत नाहीत. आमची तिसरी पिढी राजकारणात आहे. आम्ही कधीही टक्केवारीचे राजकारण केले नाही. आम्ही सहमतीचे राजकारण करतो, सेटलमेंटचे नाही. माझ्याबरोबर सेटलमेंट करण्यासाठी लाइन लागली आहे. ज्या दिवशी विखे घराणे सेटलमेंटचे राजकारण करील, त्या दिवशी सामान्यांची हार झालेली असेल. तालुक्यातील राजकारणात अपेक्षेची सवय लागली आहे. राजकारणात अर्थकारण जुळत गेले, तर मी राजकारण सोडून देईन. आम्ही जनतेसाठी सत्तासंघर्ष करतो.”
“आम्ही आमचे फोटो व्हायरल केले, तर सोशल मीडिया हॅंग होईल. आम्ही असे आहोत, असेच राहणार. आम्हाला जनतेला सांगावे लागत नाही, की आम्ही किती साधे आहोत? के. के. रेंजबाबत राजकारण केले गेले. शेतकऱ्यांना सरावाच्या काळातील जमिनीचे भाडे मिळावे, अशी माझी मागणी होती. मात्र त्यात राजकारण आले. आम्हीच शेतकऱ्यांच्या जमिनी सोडविल्या, असे सांगून फटाके वाजविले गेले. पण स्वातंत्र्यापासून शेतकऱ्यांच्या जमिनीची के. के. रेंजमध्ये असणारी स्थिती तशीच आहे,” असंदेखील डॉ. विखे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.