इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये विराट कोहलीचा आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात RCBचा माजी कर्णधार विराट चांगलाच संतप्त दिसला. यावेळी विराट अम्पायरच्या निर्णयावर नाराज झाला आणि त्यानंतर त्याने रागाच्या भरात आपली बॅट जमिनीवर आपटली आणि पंचांशी वादही घातला. विराट तंबूत जात असताना तिथे असलेली कचरापेटीही त्याने पाडली. त्याच्या या वागण्याची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली आणि त्याच्या मॅच फीमधील ५० टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केली. पण, आता आणखी एक व्हिडीओ समोर येत आहे, ज्यावरून विराटच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विराट स्वस्तात बाद झाला. त्याची विकेट वादग्रस्त ठरली ज्यावर वेगवेगळे तज्ज्ञ आजही आपली मते देत आहेत. हर्षित राणाच्या फुल टॉस बॉलवर विराट बाद झाला. कोहलीला हा नो बॉल वाटला पण अम्पायरने त्याला बाद घोषित केले. अखेर नियम पाहिल्यानंतर विराट कोहली बाद झाल्याचे दिसून आले. मात्र, अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ अजूनही या चेंडूला ‘नो’ म्हणत आहेत. हा नियम बदलायला हवा, असेही काहींनी सांगितले.
विराट जेव्हा मैदानाबाहेर गेला तेव्हा तो खूप रागावलेला दिसत होता. सामना संपल्यावरही विराट पंचांना नाबाद असल्याचे समजावताना दिसला. सामना संपल्यानंतर अम्पायर आणि खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. अशा स्थितीत विराटने दोन्ही पंचांशी हस्तांदोलन केले नाही. पंचांनी विराटकडे हात पुढे केला पण विराटने त्यांना नकार देत पुढे निघून गेला. या सामन्यात विराट कोहली ७ चेंडूत १८ धावा करून बाद झाला होता. RCBसाठी विराटची विकेट हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली, कारण शेवटी १ धावांनी त्यांचा पराभव झाला.