Congress MP Rajiv Satav passes away

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

पुणे महाराष्ट्र

पुणे : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. सातव यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

२२ एप्रिलला सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते. उपचारानंतर ते बरे झाले होते. मात्र त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यांना सायटोमेगालो विषाणूचा संसर्ग झाला होता. राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ते अनेक दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली.

काँग्रेस नेते आणि प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विट करत ही माहिती दिली. राजीव सातव यांनी माझ्यासोबत युवक काँग्रेसमध्ये काम सुरू केले होते, असा एक साथीदार आज गमावला. राजीव सातव यांचा साधेपणा, हसरेपणा, त्यांची जमिनीशी जुळलेली नाळ, नेतृत्व आणि पक्षावर असलेली त्यांची निष्ठा आणि मैत्री आपल्याला नेहमीच लक्षात राहील. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राजीव सातव यांची कारकीर्द :

राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.

राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती.

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत