मुंबई : वांद्रे पश्चिम परिसरात असलेल्या बँडस्टँड भागात एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही तरुणी आपल्या सोबत बँडस्टँड येथे फिरायला गेली असता ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी या तरुणीच्या बॉयफ्रेण्डसह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ११ मे रोजी रात्री बॉयफ्रेंडसोबत वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड या समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेली होती. तेथे या तरुणीच्या बॉयफ्रेंडचे दोन मित्र आले. त्यानंतर या तिघांनी या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. हे सर्व आरोपी पीडित तरुणीच्या परिचयाचे आहेत. हे सर्व आरोपी २० ते २३ या वयोगटातील आहेत. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर पीडित तरुणी घरी आली. त्यानंतर तिने तिच्या बहिणीला पोटात दुखत असल्याचं सांगितलं. तिच्या बहिणीने विचारपूस केल्यानंतर तिने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं सांगितलं.
पीडितेच्या बहिणीने दुसऱ्या दिवशी वांद्रे पोलिस ठाण्यात जाऊन बहिणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण वांद्रे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. वांद्रे पोलिसांनी त्या तीनही आरोपींना अटक केली. त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.




