यवतमाळ : पुसद तालुक्यातील धनसळ गावात रामपूरनगर येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी ९.30 वाजताच्या सुमारास घडली. सुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून आकाश श्रीराम आडे (२५) असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही एकाच गावात राहत होते. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
आरोपी आकाश सुवर्णावर अनेक दिवसापासून एकतर्फी प्रेम करीत होता. काल १५ मे रोजी सुवर्णा चव्हाण हिचे आई, वडील, भाऊ बाहेरगावी लग्नाला गेले. आरोपी आकाशला याची माहिती मिळाल्यानंतर तो तरुणीच्या घरात घुसला आणि आपल्या जवळील गुप्तीने तरुणीच्या पोटात सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला.
गावात या घटनेची वार्ता पसरताच नागरिकांनी तेथे गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पुसद येथे पाठविला. या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला धनसळ येथील जंगलातून ताब्यात घेतले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल चावडीकर करत आहे.
धक्कादायक : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली आणि अनर्थ घडला..




