नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चमकदार कामगिरी केली आहे. तर महायुतीच्या वाट्याला ४८ पैकी केवळ १७ म्हणजे जेमतेम एक तृतीयांश जागा आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेच्या १५ जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना सातच जागा मिळाल्या. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिंदेंच्या शिवसेनेची केवळ एका राज्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे यांनी एकत्र यावे, अशा आशयाचे बॅनर दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर लागले आहेत.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने एक भावनिक होर्डिंग लावण्यात आलं आहे. हे होर्डिंग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. शिवसेना पक्ष दोन गटांमध्ये विभागले गेल्यानंतर राज्यातील शिवसैनिकांची अवस्था कोणता झेंडा घेऊ हाती, अशी झाली होती. लोकसभा निवडणुकीत देखील याचे पडसाद उमटले होते. आता तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतरही महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची भावना या होर्डिंगवर उमटताना दिसतेय.
सर्व शिवसैनिक आणि नेत्यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचं आवाहानच या होर्डिंगमधून करण्यात आलंय. शिवसैनिकांनो, वाघांनो… संघटित व्हा ! महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील बनवा ! आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा ! असं या होर्डिंगवर लिहिलं आहे.