मुंबई : ऑलराउंडर रविंद्र जडेजाच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६९ धावांनी पराभव केला. चेन्नईचा हा सलग चौथा विजय ठरला आणि बेंगळुरूचा हा पहिलाच पराभव होता. या विजयासह चेन्नईने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. असून बेंगळुरूच्या संघाची घसरण झाली आहे.
कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांनी चेन्नईच्या डावाची सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९.१ षटकात ७४ धावा केल्या. ऋतुराज २५ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या रैनाने फाफसह चांगली भागीदारी केली. पण १११ धावांवर प्रथम रैना २४ धावांवर, तर फाफ ५० धावांवर बाद झाला. अंबाती रायडू ७ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. अखेरच्या षटकात जडेजाच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने २० षटाकत १९१ धावा केल्या. जडेजाने २८ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या. जडेजाने हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात पाच षटकार मारले. त्याने या षटकात ३७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात महाग षटक ठरले.
Big effort in the field today to go past #RCB. This is one victory that @ChennaiIPL will cherish for a long time! https://t.co/9lEz0r9hZo #SRHvDC #VIVOIPL pic.twitter.com/7N3a1y4OmI
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2021
विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बेंगळुरूची सुरूवात चांगली झाली. पहिल्या ३ षटकात देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली यांनी ४४ धावा केल्या. पण सॅम करनने चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला (८ धावा) बाद केले. त्यानंतर शार्दुलने देवदत्तला बाद केले. देवदत्तने १५ चेंडूत ३४ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला जडेजाने बाद केले. त्यानंतर जडेजाने ग्लेन मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केलं. नंतर डॅनियल ख्रिस्टिनला जडेजाने धावबाद केले. बेंगळुरूची अवस्था ५ बाद ८१ अशी होती. मैदानावर एबी डिव्हिलियर्स असल्याने आरसीबीला आशा होत्या. पण जडेजाने पुन्हा एकदा कमाल करत त्याला देखील क्लीन बोल्ड केले आणि बेंगळुरूचा पराभव निश्चित केला. बेंगळुरूने २० षटकात ९ बाद १२२ धावा केल्या.
या सामन्यात जडेजाने नाबाद ६२ धावा केल्या. गोलंदाजीत ४ षटकात १३ धावा देत ३ विकेट तर क्षेत्ररक्षणात एकाला धावबाद केले. आजच्या सामन्यात जडेजाने अतिशय दमदार कामगिरी केली.




