विराट कोहलीच्या RCB संघाचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. संघाच्या पराभवानंतर विराट कोहलीने RCB च्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. यातच आता संजय मांजरेकर यांनी एक पाऊल पुढे जात RCB च्या टीम मॅनेजमेंटला विराट कोहलीबद्दल निर्णय घ्यावा लागेल असं म्हटलं आहे.
“आता ही गोष्ट कर्णधारावर अजिबात अवलंबून राहिलेली नाही. याबद्दल टीम मॅनेजमेंट आणि मालकांनी निर्णय घ्यायला हवा. कारण नेतृत्व कोण करेल आणि संघाला कशाप्रकारच्या कर्णधाराची गरज आहे हे निर्णय मॅनेजमेंट आणि मालक घेत असतात. जर तुम्हाला परिस्थितीत बदल झालेला पहायचा असेल आणि चांगले निकाल हवे असतील तर कर्णधार बदलणं गरजेचं आहे. विराट कोहलीने स्वतः मी चांगली कामगिरी केली नाहीये, हे सांगणं मला अपेक्षित नाही. इकडे संघाच्या मालकांनी हा निर्णय घेतला पाहिजे. जर RCB चा संघ आतापर्यंत एकही विजेतेपद जिंकू शकलेला नाही तर मी यासाठी संघ मालकांना जास्त दोषी धरेन कारण त्यांनी संघाला योग्य नेतृत्व दिलं नाही.” असं मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केलं आहे.