नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकरिया याच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालं आहे. चेतन साकरिया याचे वडील कांजीभाई साकरिया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गुजरातच्या भावनगरमधील एका खाजगी रुग्णायलयात उपचार सुरु होते. तिथेच आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
चेतन साकरियाने आठवड्यापूर्वी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं कि, “काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सकडून माझे पैसे मिळालेत. मी ते पैसे घरी ट्रान्सफर केले आहेत. वडील कोरोनाविरोधी लढाई लढतायेत. अशा परिस्थितीत ते पैसे माझ्या कुटुंबाच्या कामी येतील आणि माझ्या वडिलांवर चांगले उपचार होतील.” पहिले काही दिवस त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला. मात्र नंतर त्यांची तब्येत खालावत गेली. अखेर आज दुपारी त्यांचं कोरोनाने निधन झालं.
It pains us so much to confirm that Mr Kanjibhai Sakariya lost his battle with Covid-19 earlier today.
We’re in touch with Chetan and will provide all possible support to him and his family in this difficult time.
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 9, 2021
चेतन साकरियाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्याचे वडील टेम्पोचालक होते. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने चांगलं शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी करावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. त्याच्या चुलत्याने त्याला त्यांच्या दुकानात काम करायला सांगितले आणि त्याच्या शिक्षण आणि खेळाचा खर्च उचलला. आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये चेतनने राजस्थानकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. आता कुटुंबाला चांगले दिवस पाहायला मिळतील, अशी आशा त्याला होती. परंतु, आज चेतनच्या वडिलांचे निधन झाले. काही महिन्यांपूर्वी चेतन साकरियाच्या भावाने आत्महत्या केली होती. त्यामुळे आता 22 वर्षीय चेतनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकरियाने यंदाच्या साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पदार्पणातच त्याने चमकदार कामगिरी केली. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने 3 फलंदाजांना बाद करुन धडाकेबाज एन्ट्री केली. तसेच चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये देखील त्याने तीन विकेट घेतल्या होत्या, त्यात धोनीचा समावेश होता. राजस्थानकडून खेळलेल्या सहा सामन्यांत त्याने उत्तम गोलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सने फेब्रुवारीत झालेल्या लिलावात 1.20 कोटी रुपयांत चेतनला आपल्या टीममध्ये घेतलं होतं.




