IPL २०२०च्या प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्स पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आली आहे. गुरुवारी धोनीच्या टीमने कोलकाता नाईट रायडर्सला रोमांचक सामन्यात मात दिली. धावसंख्येचा पाठलाग करताना सीएसकेने केकेआरला धूळ चारली.
युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने ५३ चेंडूंत ७२ धावा काढत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला आणि शेवटच्या षटकात सर जडेजाने धमाकेदार फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईला विजय मिळवून दिल्यानंतर युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भरभरून स्तुती केली.
ऋतुराजने सलग दुसऱ्या सामन्यात सामनावीराचा किताब मिळवल्यानंतर म्हटले कि, ‘मला खूप छान आणि आत्मविश्वासाने भरलेले वाटत आहे. माझ्या दोन खेळ्या संघाच्या विजयासाठी महत्वाच्या ठरल्या याचा मला आनंद आहे.’ २३ वर्षीय ऋतुराजला आयपीएलच्या सुरुवातीला कोरोना संक्रमण झाले होते आणि त्यामुळे सुरुवातीला त्याला संधीही मिळाली नव्हती.
ऋतुराज म्हणाला कि, “आमचा कर्णधार नेहमी म्हणतो की प्रत्येक परिस्थितीचा सामना हसत करावा. मी हाच प्रयत्न करत आहे. हे कठीण आहे, पण माझे प्रयत्न चालू आहेत. कोरोनाने मला मजबूत केले. कोरोनाने मला वर्तमानात राहण्याची शिकवण दिली आहे. भूतकाळात न राहण्याचा आणि भविष्याचाही फारसा विचार न करण्याचा धडा या कठीण काळाने मला दिला आहे.”