जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात हरिपरीगाम येथे दहशतवाद्यांनी घरात घुसून एका माजी विशेष पोलीस अधिकारी (SPO) आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. फय्याज अहमद यांच्यासहीत त्यांच्या पत्नीची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात त्यांची अल्पवयीन मुलगी देखील गंभीर जखमी झाली होती. तिचादेखील उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रविवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. सुरक्षा दलानं संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी विशेष पोलीस अधिकारी फय्याज अहमद यांच्या घरावर दहशतवाद्यांनी रात्रीच्या वेळी हल्ला केला. दहशतवाद्यांनी थेट घरात घुसून अंदाधुंद गोळीबार करत त्यांची हत्या केली. रात्री ११.०० वाजल्याच्या सुमारास पुलवामाच्या अवंतीपोरा भागातील इरिपरिगाम भागात ही घटना घडली. या घटनेत फय्याज अहमद यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर झालेल्या त्यांच्या पत्नीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांची गंभीर जखमी झालेली मुलगी राफिया हिनेदेखील काही तासांतच अखेरचा श्वास घेतला.
याआधी रविवारी पहाटे जम्मूतील हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांकडून बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. जम्मूत हवाई दलाच्या तळावर ड्रोनने हल्ला करण्यात आला असून हे ड्रोन पाकिस्तानातून आल्याचं गुप्तचर संस्थांनी सांगितलं आहे. देशात भारतीय सैन्यावर ड्रोनद्वारे हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे.




