Do not take Covishield and Covaxin vaccines if you have these problems

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याला समर्थन दिलंच नव्हतं, वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा

कोरोना देश

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून १३ मे रोजी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित करण्यात आलं होतं. हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटाने केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, आता यासंदर्भात तज्ज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा तज्ज्ञ गटातल्या ३ सदस्यांनी केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एकीकडे देशात लसींचा तुटवडा असताना केंद्र सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय जाहीर केला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, 13 मे रोजी केंद्र सरकारनं कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट केलं होतं. त्यावेळी केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायजेशन (NTAGI) मधील वैज्ञानिकांच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले होते. परंतु, यापैकी काही तज्ज्ञांनी खुलासा केला आहे की या गटाने अंतर दुप्पट करण्याला कधीही समर्थन दिलं नव्हतं. आरोग्यमंत्रालयानं स्पष्टीकरणात ज्या वैज्ञानिकांच्या संस्थेचं नाव घेतलं होतं, त्या संस्थेमधील तीन वैज्ञानिकांनी आपण कोणतीच शिफारस केली नसल्याचं म्हटलं आहे. या संस्थेमध्ये एकूण 14 सदस्य आहेत. तसेच या निर्णयासाठी कोणताही वैज्ञानिक आधार असल्याचं आम्हाला माहिती नाही, असंही ते म्हणाले आहेत.

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते रॉयटर्सशी बोलताना म्हणाले कि, “जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सल्ल्यानुसार NTAGI च्या वैज्ञानिकांनी ८ ते १२ आठवड्यांपर्यंत अंतर वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. पण १२ ते १६ आठवडे हे केंद्र सरकारचे आकडे आहेत. दोन डोसमधील अंतर १२ आठवड्यांपेक्षा जास्त झालं, तर त्याचे कोणते संभाव्य परिणाम होऊ शकतात, याचा कोणताही डेटा NTAGI कडे नाही.” NTAGI मधले दुसरे सदस्य मॅथ्यु वर्गेसी यांनी गुप्तेंच्या दाव्याला दुजोरा देत म्हटले कि, “NTAGI ने फक्त ८ ते १२ आठवड्यांपर्यंत अंतर वाढवावं असा सल्ला दिला होता.”

दरम्यान, भारताचे अग्रणी वायरोलॉजिस्ट शाहीद जमील यांनी केंद्र सरकारच्या कोरोना हाताळण्याच्या पद्धतीवर टीका करत तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, “दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याच्या निर्णयामागची कारणं संबंधित यंत्रणांनी स्पष्ट करावीत. कोरोनाचा प्रसार वाढत असताना आपण मोठ्या प्रमाणावर लोकांचे लसीकरण करून त्यांचे संरक्षण केले पाहिजे.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत