इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदेमध्ये मंगळवारी (१5 जून) जोरदार राडा झाला. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये सत्ताधारी पीटीआय आमि विरोधी पक्षाच्या खासदारांनी एकमेकांना फाइली फेकून मारल्या तसेच शिवीगाळ केला. संसदेत सुरु असलेल्या या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना सभागृहात बोलवावे लागले.
वृत्तानुसार, मंगळवारी फेडरल बजेट २०२२-२२ च्या सर्वसाधारण चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा गदारोळ सुरू झाला. सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. त्याच दरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते अली अवान यांनी विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी एक पुस्तिकाही विरोधकांच्या दिशेने फेकली. त्यानंतर प्रचंड गदारोळ सुरु झाला. सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये हाणामारी आणि शिविगाळ सुरु झाला. दोन्ही बाजूच्या खासदारांनी एकमेकांवर अर्थसंकल्पाच्या प्रती फेकून मारल्या.
“یہ ہم ہیں،
یہ ہماری پارلیمنٹ ہے
اور یہ قانون سازی ہو رہی ہے!” pic.twitter.com/viXwApvW0g— Mansoor Ali Khan (@_Mansoor_Ali) June 15, 2021
खासदारांमध्ये सुरू असलेली हाणामारी थांबवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना बोलवण्यात आले. मात्र, त्यांनाही या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यानंतर वरिष्ठ सभागृहाच्या सुरक्षा रक्षकांना बोलवण्यात आले. त्यानंतरही नॅशनल असेंब्लीमध्ये शिवीगाळ आणि एकमेकांवर पुस्तिका फेकून मारण्याचे प्रकार सुरूच होते. पाकिस्तानच्या वाहिन्यांवर या गदारोळाचे थेट प्रक्षेपण सुरू होते. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.




