पाकिस्तानमधील पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. दीर कॉलनीमधील मदरशामध्ये हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाले असल्याचं वृत्त डॉन या वृत्तवाहिनीने दिलं आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक मन्सून अमन यांनी बॉम्बस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून स्फोटाचं कारण तसंच त्यामागे कोण होतं याची माहिती घेतली जात असल्याचं सांगितलं आहे.
जखमींना जवळच्या लेडी रिंडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद आसीम यांनी सात मृतदेह आणि ७० जखमींना रुग्णालयात आणण्यात आलं अशी माहिती दिली आहे. जखमींवर तात्काळ उपचार केले जात असून रुग्णालयाचे संचालक स्वत: आपातकालीन विभागात हजर असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय रुग्णालयात वैद्यकीय सुविधेसाठी एमर्जन्सी जाहीर करण्यात आली आहे असं देखील ते म्हणाले आहेत.