माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्यावर आज दुपारी 12:30 वाजता पातूर येथील डॉ. वंदनाताई ढोणे स्मृतिस्थळ येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. ते गेली अनेक वर्षे वेगळ्या विदर्भाची चळवळ हाती घेऊन लढा देत होते.
डॉ. जगन्नाथ ढोणे हे एम. एस. सर्जन होते. त्यासोबत त्यांनी राजकारणातही आपली ओळख निर्माण केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर अकोट मतदार संघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी वेगळ्या विदर्भाचा वसा हाती घेत अनेक वर्ष वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी लढा दिला.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस आणि भाजप असा डॉ. जगन्नाथ ढोणे यांचा राजकीय प्रवास राहिला. वयाच्या 60 वर्षांनंतरही ते भाजपात सक्रिय नेते होते. त्यांच्या निधनामुळे पातूरवर शोककळा पसरली आहे.