मुंबई : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश जारी केला आहे. त्यानुसार, जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्यांविषयी संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा असे सांगितले आहे. आयुक्तांनी सर्व पोलिसांना निर्देश दिले आहेत की, जखमी व्यक्तीकडे प्रथम वैद्यकीय अहवाल (medical report) न मागता त्यांना लवकरात लवकर उपचार कसा मिळेल याला प्राधान्य द्यावे. जे कर्मचारी या आदेशाचं पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की, एखादी जखमी व्यक्ती पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आली असता त्याला वैद्यकीय उपचाराकरता पोलीस ठाण्यामार्फत मदत न देता जखमी व्यक्तीला परस्पर रुग्णालयातून उपचार घेण्याबाबत सांगितले जाते, तसेच त्यांना मदत करण्याऐवजी जखमी व्यक्तीला स्वतः वैद्यकीय अहवाल आणण्यास सांगितले जाते, ही बाब अत्यंत चुकीची आहे.
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आदेशात स्पष्ट केले आहे की, “यापुढे कोणतीही जखमी व्यक्ती पोलीस ठाण्यात आली आणि त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचाराची गरज असेल तर, तात्काळ जखमी व्यक्तीसोबत एक वैद्यकीय तपासणीसाठी मेमो देऊन आणि पोलीस स्टेशनच्या दैनंदिनीत त्याची नोंद करून त्या जखमी व्यक्तीसह एक अंमलदार शासकीय रुग्णालयात पाठवण्यात यावा आणि त्यानंतर उपचार झाल्यावर परिस्थिती बघून रुग्णालयात अथवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करावी. यात कसूर केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.”

वरिष्ठ पोलिसांचा आदेश सर्व पोलीस सहआयुक्त, सर्व अपर पोलीस आयुक्त, सर्व पोलीस उप आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलिस ठाणे, शाखा यांना पाठवण्यात आला आहे.




