भारतातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानने कबुली दिली आहे. पाकिस्तानने यापूर्वी दहशतवादी हल्ल्यात आपला सहभगा नसल्याचं सांगितलं होतं पण आता त्यांनी कबुली दिल्यावर त्यांचा चेहरा सर्वांसमोर उघडा पडला आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. पाकिस्तानने दिलेल्या कबुलीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य करत विरोधकांचाही समाचार घेतला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “पुलवामा हल्ला झाल्यावर काही लोक या दु:खात सहभागी नव्हते तर यामध्येही आपला राजकीय स्वार्थ पाहत होते. त्यावेळी कशा प्रकारची चर्चा होत होती, कसे-कसे वक्तव्य करण्यात आले हे देश विसरू शकत नाही. त्यावेळी स्वार्थ आणि अहंकाराने भरलेलं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू होतं.”
आम्ही वीर जवानांकडे पाहून विरोधकांचे सर्व आरोप शांतपणे ऐकले. पण गेल्या काही दिवसांत शेजारील देशांतून जे वृत्त आले, त्यांनी त्यांच्या संसदेत हल्ल्याची कबुली दिली आहे, त्यामुळे या सर्वांचे खरे चेहरे समोर आले आहेत. आपल्या स्वार्थासाठी आणि राजकीय स्वार्थासाठी हे लोक कुठल्या थरावर जाऊ शकतात हे पुलवामा हल्ल्यानंतर घडलेल्या प्रकारावरुन दिसून येतं, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
मी या राजकीय पक्षांना आग्रह करतो की, देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी, सुरक्षा दलाच्या मनोबलासाठी कृपया असे राजकारण करू नका, अशा गोष्टी करणं टाळा. आपल्याला नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे की देशहित हे आपल्या सर्वांसाठी सर्वोच्च हित आहे, असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं.