आयपीएलच्या आजच्या डबल हेडरमध्ये (एका दिवसात 2 सामने), 4 संघांपैकी दोन संघांना प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्स आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुपारी ३.30 वाजता दुबई येथे सामना रंगेल. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शारजाह येथे सायंकाळी ७.30 वाजता सामना होईल.
दिल्ली आणि बेंगळुरू जर आज सामना जिंकले तर प्ले ऑफमध्ये दोन्ही संघ निश्चित होतील. हा सामना हैदराबादला तर जिंकावाच लागेल. जर हैदराबाद संघ येथे पराभूत झाला तर त्यांना प्ले-ऑफसाठी किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
मागच्या वेळी या दोन्ही संघात झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीला 5 गडी राखून पराभूत केले. अबू धाबी येथे झालेल्या मोसमातील 27 व्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 162 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईने 5 विकेटवर 166 धावा करुन सामना जिंकला.
मोसमातील 11 व्या सामन्यात बेंगळुरूने हैदराबादला 10 धावांनी पराभूत केले. दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 163 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबादचा संघ 153 धावा करू शकला.
दुबई आणि शारजाहमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे स्लो विकेटमुळे स्पिनर्सनाही खूप मदत होईल. दोन्ही ठिकाणी नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.