नवी दिल्ली : भारतीय लस कोवॅक्सिन ही कोरोनाच्या 617 व्हॅरिएंटवर गुणकारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. ही माहिती व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अॅन्थोनी फाऊची यांनी दिली आहे. भारतात कोरोनामुळे हाहाकार माजलेला असताना कोवॅक्सिन लस 617 प्रकारच्या कोरोना प्रजातींवर गुणकारी असल्याचा अमेरिकेचा अभ्यास काहीसा दिलासादायक आहे.
व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थोनी फाऊची यांनी सांगितलं की, आम्ही कोरोनासंबंधी रोज डेटा गोळा करतोय. जे लोक भारतीय कोवॅक्सिन लस घेत आहेत त्यांचा अभ्यास केल्यानंतर ती लस कोरोनाच्या 617 प्रजाती अर्थात व्हेरिएन्टवर गुणकारी आहे असं समोर आलं आहे. ही लस घेतल्यानंतर संबंधिताच्या शरीरात कोरोना विषाणूच्या विरोधात अॅन्टीबॉडीज् तयार होत आहेत. भारतीय कोवॅक्सिन लस ही जगातील कोरोनाच्या 617 प्रकारांच्या व्हेरिएंटना पुरून उरतेय.
हैदराबादची कंपनी भारत बायोटेक स्वदेशी लस कोवॅक्सिनची निर्मिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या मदतीने करत आहे. स्वदेशी लस म्हणून ओळखली जाणारी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसीचा फेज 3 चाचणीचा अंतरिम निकाल जाहीर केला आहे. यात ही लस डबल म्युटेंटसह कोरोनाच्या सर्व प्रकारांवर 78 टक्के कार्यक्षम असल्याचा अहवाल आयसीएमआरनं दिला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कोव्हॅक्सिन लस सध्या घातक असलेल्या कोरोनाच्या डबल म्युटेंटवर प्रभावी असल्याचे आढळले आहे. गंभीर स्वरुपाच्या कोविड विरुद्ध कोव्हॅक्सिन 100 टक्के कार्यक्षम असल्याचं म्हटलं आहे.




