नवी दिल्ली : आपण अॅक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर आपल्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे. आता अॅक्सिस बँकेतून पैसे काढणे महाग होणार आहे. बँकेने बचत खात्यातून रक्कम काढण्यावरील आणि SMS शुल्क वाढविले आहे. नवीन दर 1 मे 2021 पासून लागू होतील.
वृत्तानुसार, 1 मे 2021 पासून अॅक्सिस बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यात सरासरी किमान मासिक 15,000 रुपये शिल्लक ठेवावे लागतील. सध्या ही मर्यादा 10,000 रुपये आहे. याशिवाय बँकेने प्राइम आणि लिबर्टी बचत खात्यात सरासरी किमान शिल्लक मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढविली आहे.
किमान शिल्लक नसल्यास :
अॅक्सिस बँक आपल्या बचत खाते धारकांना एका महिन्यात 4 व्यवहार किंवा 2 लाख रुपये विनामूल्य काढण्यास परवानगी देते. यानंतर रोख रक्कम काढल्यावर प्रति हजार 5 रुपये किंवा जास्तीत जास्त 150 रुपये घेतात. आता बँकेने विनामूल्य व्यवहारानंतर लागणारे 5 रूपये शुल्क वाढवून 10 रुपये केले आहे. तथापि, जास्तीत जास्त 150 रुपये शुल्क कायम ठेवण्यात आले आहे. म्हणजेच किमान शिल्लक न ठेवल्यास बँक 50 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत शुल्क आकारेल.
SMS चार्ज देखील वाढले
याशिवाय आता बँक प्रति एसएमएसवर 25 पैसे आकारेल. सध्या यासाठी दरमहा 5 रुपये आकारतात. हा नवीन दर 1 जुलै 2021 पासून लागू होईल. यात ओटीपी आणि बँकेने पाठविलेला प्रचारात्मक SMS (promotional SMS) समाविष्ट असणार नाही.
वेतन खात्याच्या (सॅलरी अकाउंट) नियमात बदल :
अॅक्सिस बँकेने वेतन खात्याचे नियमही बदलले आहेत. जर आपले वेतन खाते 6 महिन्यांपेक्षा जुने असेल आणि कोणत्याही एका महिन्यात काही क्रेडिट नसेल तर दरमहा 100 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच जर आपल्या खात्यात 17 महिन्यांपर्यंत व्यवहार झाला नसेल तर 18 व्या महिन्यात 100 रुपये शुल्क आकारले जाईल.




