मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा, अशा सूचना दिल्या आहेत. वसंतदादा शुगर इस्टिट्यूटकडून याबाबत सर्व साखर कारखान्यांना पत्र देण्यात आलं आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळं सर्व साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करावे, असं पत्रात म्हटलं आहे.
सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजन उभारणीचे प्रकल्प हातात घ्यावेत. ऑक्सिजन प्रकल्पाला वाफ आणि वीजेची गरज भासते. साखर कारखाने सुरू असताना वाफ आणि वीज उपलब्ध होते. त्यामुळे कारखान्यांना ऑक्सिजन प्रकल्प उभं करायला कमी खर्च लागेल, असं शरद पवार यांनी निर्देशित केलं असल्याचं संचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
ज्या साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरु आहेत तसेच ज्यांचे सहवीजनिर्मिती व आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत. अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे अशा कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत. सध्याची परिस्थिती भयावह असून रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार प्रयत्नशील आहेतच, मात्र सर्व कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. कारखान्यांना आसवणी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुद्ध करण्याचा आणि कार्बनडायऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव आहे. याठिकाणी फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारायचा आहे. या संदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्वींग अॅडसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करावी, असं पत्रात म्हटलं आहे.




