धनत्रयोदशीच्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. मॉर्टर आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या कृतीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे काही बंकर तसेच दहशतवाद्यांचे नियंत्रण रेषेजवळचे लाँचपॅड उद्ध्व्स्त झाले. भारताने जबर दणका दिला. प्राथमिक वृत्तानुसार पाकिस्तानच्या किमान ११ जवानांचा मृत्यू झाला आणि १६ जवान जखमी झाले. काही दहशतवादीही ठार झाले.
जंगलातील दहशतवाद्यांच्या लाँचिंग पॅडवर लगबग वाढल्याची माहिती भारताच्या सिग्नल्स आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेने मिळवली. यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. कारवाई करताना भारताने पाकिस्तानचे बंकर तसेच जंगलातील दहशतवाद्यांचे लाँचिंग पॅड यांना लक्ष्य करुन जोरदार मारा सुरू केला. भारताच्या अचूक माऱ्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. भारताने नियंत्रण रेषेजवळचा पाकिस्तानचा शस्त्रसाठा तसेच एक इंधनसाठा नष्ट केला. सातत्याने मोठे स्फोट सुरू झाले. या स्फोटांमुळे पाकिस्तानच्या लष्कराची जबर हानी झाली. भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या स्पेशल कमांडो ग्रुपचे किमान तीन कमांडो ठार झाल्याचे वृत्त आहे.
जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तानच्या कारवाईत भारताच्या तीन जवानांनी बलिदान दिले. किमान चारजण जखमी झाले. उरी सेक्टरमध्ये दोन तर गुरेझ सेक्टरमध्ये एक भारतीय जवान हुतात्मा झाला. तसेच संध्याकाळी आणखी एक जवान हुतात्मा झाल्याचे वृत्त आले. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताच्या ३ नागरिकांचाही मृत्यू झाला तसेच काही नागरिक जखमी झाले. हुतात्मा झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्रातील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे आहेत. ऋषिकेश रामचंद्र जोंधळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात असलेल्या बहिरेवाडी गावचे निवासी होते. ते २० वर्षांचे होते.