नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंग राजपूतची बहीण प्रियंका सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रियंका सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून तिच्याविरूद्ध दाखल केलेली FIR रद्द करण्याची मागणी केली आहे.
7 सप्टेंबर 2020 रोजी रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या बहिणींविरूद्ध मुंबईच्या वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये बनावट प्रिस्क्रिप्शन आणि प्रतिबंधित असलेली औषधे सुशांतला दिल्याच्या आरोपाखाली FIR दाखल केली होती. रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या एफआयआरचीही सीबीआय चौकशी करीत आहे. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्यास नकार दिला होता. मात्र, सुशांतची धाकटी बहीण मितू हिला कोर्टाने दिलासा देत तिच्यावरील खटला रद्द केला.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा मृतदेह गेल्या वर्षी 14 जूनला त्याच्या मुंबईच्या घरात आढळला होता. सुरुवातीला आत्महत्येच्या या प्रकरणात नंतर ड्रग्सचा अँगल जोडला गेला. रिया चक्रवर्तीवर पैशांची अफरातफरी, ड्रग्सचा पुरवठा आणि सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिने तुरुंगातही काही काळ घालवला आहे. ती सध्या बाहेर आहे. या प्रकरणात त्याचा भाऊ शौविक चक्रवर्तीही तुरूंगात गेला होता, नंतर त्यालाही जामीन मंजूर झाला.




