शिर्डी : नगर जिल्ह्यातील नवे मंत्री आणि काही आमदार, आपण किती साधे आहोत, असा आव आणत आहेत. हे फक्त प्रसिद्धीसाठी दाखविले जाते. राज्याचा पैसा खाऊन तुम्ही संत असल्याचा आव आणता का? दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन ढवळाढवळ करीत कामाचे श्रेय घेतल्यास, मी तुमच्या मतदारसंघात येऊन तुमची पोलखोल करीन,” असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
डॉ. सुजय विखे म्हणाले कि नगरमधील बहुतांश विकासकामांसाठी केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याची परवानगी घ्यावी लागते. शहर व परिसरातील बहुतेक विकासकामे संरक्षण खात्याशी निगडित आहेत. के. के. रेंजचा प्रश्न, कॅंटोन्मेंट परिसराचा प्रश्न, उड्डाणपूल, जामखेड, पाथर्डी व सोलापूर रस्त्यांच्या कामासाठी प्रत्येक वेळी दिल्लीला संरक्षण विभागात जावे लागते. ही कामे करण्यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल. अशी मिश्किल टिप्पणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.
काॅंग्रेसचे राज्यातील नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेत नुकतेच पक्षांतर झालेले मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे भाचे उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर विखे पाटील यांनी नाव न घेता टीका केली आहे.




