छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सात वर्षानंतर मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्या निमित्त सर्व मंत्री शहरात उपस्थित आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील मंत्रिमंडळाची बैठक संपली असून त्या नंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. मराठवाड्यात जाऊन फक्त घोषणा करतील बाकी काहीच नाही असं म्हटलं. आमदार आदित्य ठाकरे यांनीही टीका केली की, या सरकारकडून फक्त घोषणाबाजी सुरु आहे, मराठवाड्यातही तशाच घोषणा दिल्या जातील, ५० हजार कोटींचं पॅकेज वगैरे जाहीर केलं जाईल. प्रत्यक्षात कुठलीही योजना अमलात येणार नाही. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ते म्हणाले कि, “मंत्रिमंडळाची याआधीची जी बैठक आम्ही संभाजी नगरमध्ये घेतली होती त्यातले जवळपास सगळ्या निर्णयांची अमलबजावणी झालेली आहे. त्याची माहितीही आम्ही पत्रकारांना देणार आहोत. दुसरं जे लोक आज हे म्हणत आहेत की मागच्या बैठकीत काय झालं? त्यांना माझा सवाल आहे, अडीच वर्षात तु्म्ही मराठवाड्यासाठी काय केलं? तुम्ही सरकारमधे होतात. एखादा निर्णय मागे राहिला असेल तर पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची होती. तुम्ही अडीच वर्षे माशा मारत होतात का? मराठवाडा वॉटरग्रिडचा मुडदा पाडण्याचं काम ज्या सरकारने केलं आता तेच लोक आम्हाला विचारत आहेत. जे दिलं होतं त्याचाही मुडदा पाडला. यांना मराठवाड्याशी घेणंदेणं नाही. जर मराठवाड्याच्या हितासाठी बैठक होत असेल तर ती हाणून कशी पाडायची हा यांचा कावा आहे हे कावेबाज लोक आहेत.”




