All talk of leaving MNS by Vasant More comes to an end

मी माझ्या साहेबांसोबत… वसंत मोरे यांच्याकडून पक्ष सोडण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम

पुणे महाराष्ट्र राजकारण

पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांना पक्षाच्या पुणे विभागाच्या प्रमुख पदावरून हटवल्याच्या एका दिवसानंतर त्यांना विविध राजकीय पक्षांच्या ऑफर आल्या. त्यानंतर ते पक्ष सोडणार का? अशी चर्चा सुरु होती. मात्र, मोरे यांनी सुरुवातीपासूनच ते मनसेतच राहणार असल्याचं म्हटलं होतं. आता त्यांनी ट्विट करत मी माझ्या साहेबांसोबतच असल्याचे सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच फोटो शेयर केला आहे. असे करून त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आज राज ठाकरे यांनी वसंत मोरेंशी शिवतीर्थावर जवळपास तासभर चर्चा केली. वसंत मोरेंनी त्यांच्या अडचणी राज यांच्यासमोर मांडल्या. राज यांच्या भूमिकेबद्दल उघड नाराजी व्यक्त केल्याबद्दल वसंत मोरेंना जाब विचारण्यात आल्याचं समजतं. या भेटीनंतर मोरे काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. मोरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझ्या सर्व शंकांचं निरसन राज ठाकरेंनी केलं. त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं झालं. उद्या ठाण्यात राज यांची सभा आहे. त्या सभेला ये. तिथे तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं राज ठाकरेंनी सांगितलं. या सभेला मी नक्की उपस्थित राहीन, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारने कारवाई न केल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर वसंत मोरे म्हणाले होते की, मोठ्या संख्येने मुस्लिमांनी त्यांना मतदान केले असल्याने ते असे कृत्य करणार नाहीत. राज ठाकरे यांच्या आवाहनाला नकार दिल्याने मोरे यांना पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर ठाकरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी बोलावून मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती.

2006 मध्ये ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केल्यापासून वसंत मोरे पक्षाचे सदस्य आहेत. पीएमसीमध्ये सलग तीन वेळा निवडून आलेले मोरे हे एकमेव मनसे नेते आहेत. दरम्यान, वसंत मोरे यांना शहरप्रमुख पदावरून हटवण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादीने मोरे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली होती. शहर शिवसेना प्रमुख संजय मोरे यांनीही मोरे यांना फोन करून पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, मी अजूनही मनसेसोबतच आहे आणि राज ठाकरे यांचा कट्टर अनुयायी आहे, असं वसंत मोरे म्हणाले होते.

दरम्यान, मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी शुक्रवारी वसंत मोरे यांची भेट घेतली. पक्षाचे नेते राजेंद्र वागस्कर म्हणाले होते कि, वसंत मोरे हे मनसेचे कट्टर सदस्य आहेत आणि स्थापनेपासून ते पक्षासोबत आहेत. ते ज्येष्ठ नेते असून मनसेसोबतच राहणार आहेत. आमचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना सोमवारी मुंबईत बोलावले आहे. ते 11 एप्रिल रोजी मुंबईत मोरे यांची भेट घेणार आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत