पुणे : आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सामना रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (एमसीए)होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हंगामाच्या सुरुवातीला सलग सामने जिंकत होते, मात्र आता त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर चेन्नईने देखील आतापर्यंत अनेक सामने गमावले असून तीनच सामन्यांत विजय मिळवला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी पॉवर प्लेमध्ये वेगाने धावा न करणे ही मोठी समस्या आहे. विराट निश्चितपणे फॉर्ममध्ये परतला, परंतु त्याचे अर्धशतक टी-20 साठी खूपच संथ होते. कर्णधार फॅफच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. मागील सामन्यात दिनेश कार्तिक डावाला फिनिशिंग टच देऊ शकला नाही.
चेन्नईने कर्णधार बदलानंतर पुन्हा एकदा चांगले पुनरागमन केले आहे. सनरायझर्ससारख्या भक्कम गोलंदाजीचा सामना करताना त्यांच्या टॉप ऑर्डरने ज्याप्रकारे फलंदाजी केली, त्यामुळे सीएसके प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही कायम आहे. आज CSK त्यांच्या संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा करेल. दीपक चहरच्या जागी संघात सामील झालेला गोलंदाज मुकेश चौधरी अखेर लयीत आला असून त्याने मागील सामन्यात ४ बळी घेत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.




