IPL २०२० : कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेल्या १५४ धावांच्या आव्हानाचा चेन्नई सुपरकिंग्सने यशस्वी पाठलाग केला. चेन्नईने १८.५ ओव्हरमध्ये १ बाद १५४ धावा केल्या. पुणेकर ऋतुराज गायकवाडने सलग तिसरं अर्धशतक झळकावत चेन्नईला दणदणीत विजय मिळवून दिला.
#CSK end their #Dream11IPL 2020 campaign on a winning note.
Beat #KXIP by 9 wickets who are now out of the Playoffs race.#Dream11IPL pic.twitter.com/Pt512ByZat
— IndianPremierLeague (@IPL) November 1, 2020
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पंजाबच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात केली. पण अर्धशतकी भागीदारी करण्याआधीच मयंक २६ धावांवर बाद झाला. पाठोपाठ लोकेश राहुलही २९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर पंजाबने ठराविक अंतराने गडी गमावले. ख्रिस गेल (१२), निकोलस पूरन (२) स्वस्तात तंबूत गेले. मनदीप सिंगही १४ धावा काढून बाद झाला. पण दीपक हुड्डाने एक बाजू लावून धरत २६ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने नाबाद ६२ धावा केल्या आणि संघाला १५३ धावांपर्यंत मजल मारून दिली. चेन्नईकडून लुंगी एन्गीडीने ३ तर शार्दुल ठाकूर, जाडेजा आणि इमरान ताहीरने १-१ बळी टिपला.
या आव्हानाचा पाठलाग करताना फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड जोडीने चेन्नईला धडाकेबाज सलामी मिळवून दिली. या दोघांनी ८२ धावांची भागीदारी केली, पण डु प्लेसिसला अर्धशतकाने हुलकावणी दिली. तो ४८ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने आपली दमदार फलंदाजी सुरूच ठेवली आणि सलग तिसरं अर्धशतक झळकावलं. रायडूच्या साथीने त्याने चेन्नईला ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला. ऋतुराजने ६२ धावा केल्या. रायडूनेही नाबाद ३० धावा केल्या.