पुणे: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शेकडो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक रस्त्यावर उतरले आहेत आणि हल्लाबोल आंदोलन करत आहेत. आंदोलक कार्यकर्त्यांकडून ‘नोकरी दो, नशा नहीं’ अशी घोषणा केली जात आहे. काँग्रेस भवनपासून युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा निघाला आहे. बेरोजगारीविरोधी हा मोर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढला आहे.
या आंदोलनाबाबत एका कार्यकर्त्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले, देशभरात युवक काँग्रेसकडून आंदोलनं केली जात आहेत. लाखो-हजारो कोटींचे ड्रग्स मिळाल्यानंतरही सरकारकडून कुठलीही कारवाई दिसत नाही. युवकांना नोकऱ्या मिळत आहेत, पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही आज आंदोलन करत आहोत. पोलिसांनी आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
दुसऱ्या एका युवक काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले, गेल्या 10 वर्षात बेरोजगारीची दर वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अदानींच्या कडे लक्ष वळवून देशातील तरुणांना रोजगार मिळवून द्यावा. ड्रग्सच्या विरोधात कारवाई होईपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. आमचा हक्क आहे, यासाठी आम्हाला कुणाच्या परवानगीची आवश्यकता नाही.
काँग्रेस भवनपासून पुणे डेक्कनच्या दिशेने हा मोर्चा निघाला आहे. पोलिसांनी आंदोलकांना रोखत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत होते आणि सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. या आंदोलनात शेकडो तरुण सहभागी झाले आहेत. आंदोलकांची मोठी गर्दी झाली असून, पोलीस प्रशासनावर दबाव वाढला आहे. गर्दीमुळे संभाव्य धोका लक्षात घेत पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
आंदोलकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने संबंधित परिसरात रस्त्यावर बॅरिकेट्स लावले आणि आंदोलकांची धरपकड केली. आंदोलक पुणे डेक्कनच्या दिशेने जात असताना, बालगंधर्व चौकात पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी आंदोलक पोलिसांचे आदेश न मानता पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.