मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरमधून निवडणूक लढवूनच दाखवावी. आम्ही त्यांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला.
चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोथरुड येथील कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र सोडले होते. मी कोल्हापूर सोडून कोथरुडमधून निवडणूक लढलो म्हणून मी पळून आलो, असे विरोधक म्हणतात. माझी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढण्याची तयारी आहे. हवं तर कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा, मी पोटनिवडणुकीला उभा राहीन. या निवडणुकीत जिंकून आलो नाही तर मी हिमालयात निघून जाईन, असे चंद्रकांत पाटील यांनी ठणकावून सांगितले होते.
चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले. कोल्हापूरमधील आमदाराचा राजीनामा घ्यावा. भाजपने त्या जागेवर चंद्रकांत पाटील यांना उभे करावे. निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचे डिपॉझिट करण्याची ताकद आमच्यात आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.