अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन गावात डॉक्टर महेंद्र थोरात यांनी पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर थोरात यांनी आपली पत्नी वर्षाराणी, मुलगा कृष्णा आणि कैवल्य यांना सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन दिले, त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती मिळत आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
खोलीच्या दरवाजाला डायरीच्या 22 नोव्हेंबर 2021 या पानावर त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी लिहिले होते कि, “आम्ही आज आपल्यापासून कायमचा निरोप घेत आहोत. मुलगा कृष्णाला कानाने ऐकायला येत नाही त्याला समाजात अपमानास्पद वागणूक मिळत आहे. आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित झालेलो आहोत. कृष्णाचे पण कशात मन लागत नाही, सतत त्यालाही वाईट वाटते. परंतु तो कधी म्हणून दाखवत नाही. एक आई-वडील म्हणून त्याला असणारे आणि होणारे दुःख आम्ही सहन करु शकत नाही. मी आणि माझी मिसेस सौ वर्षा आम्ही दोघांनी मिळून, चर्चा करुन, विचाराने निर्णय घेत आहोत. असे कृत्य करणे आम्हालापण योग्य वाटत नाही. यासाठी कोणालाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दोषी समजू नये.”
महेंद्र थोरात यांनी आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केली. या घटनेनंतर कर्जत पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. महेंद्र थोरात यांनी गरिबांचे डॉक्टर अशी ओळख मिळवली होती. या घटनेमुळे राशीन गावात बंद पुकारण्यात आला आहे.