नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भटक्या कुत्र्यांबाबत कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना तात्काळ पकडून त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यास, त्यांना लसीकरण करून कायमस्वरूपी आश्रयस्थानात ठेवण्याचे निर्देश दिले.
या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “दिल्ली-एनसीआरमधून सर्व भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा मानवता आणि विज्ञानावर आधारित दशकांपूर्वीच्या धोरणापासून मागे जाणारा आहे. हे मूक प्राणी ही अशी समस्या नाही जी एकदम दूर करता येईल.”
राहुल गांधींच्या मते, केवळ निवारा, नसबंदी, लसीकरण आणि सामुदायिक काळजी या उपायांनीच रस्ते सुरक्षित ठेवता येतील, आणि तेही क्रूरतेशिवाय. “अचानक कुत्र्यांना एकत्रितपणे काढून टाकण्याचे पाऊल क्रूर, अदूरदर्शी आणि करुणेच्या पलीकडे आहे. आपण एकत्रितपणे सार्वजनिक सुरक्षा आणि प्राणी कल्याण सुनिश्चित करू शकतो,” असे ते म्हणाले.
The SC’s directive to remove all stray dogs from Delhi-NCR is a step back from decades of humane, science-backed policy.
These voiceless souls are not “problems” to be erased.
Shelters, sterilisation, vaccination & community care can keep streets safe – without cruelty.Blanket…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 12, 2025
यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै रोजी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाची स्वतःहून दखल घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने आठ आठवड्यांत भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृहे बांधण्याचे आदेश दिले होते. तसेच, सहा आठवड्यांत ५,००० कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहिम सुरू करण्याचे निर्देश दिले होते, ज्याची सुरुवात संवेदनशील भागांपासून करण्यास सांगितले होते. या मोहिमेत अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले होते.




