मुंबई : महाराष्ट्रातील हजारो तरुण-तरुणींची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज अखेर संपुष्टात आली आहे. राज्यातील पोलीस दलात तब्बल 15,000 नवीन भरती करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज, मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली.
ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि वाढत्या कामकाजाला हातभार लावण्यासाठी ही मोठी भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार असून पोलीस दलात नवचैतन्य निर्माण होणार आहे.
माहितीनुसार, या 15 हजार भरतींसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. पुढील २ महिन्यात ही भरती होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक, जलद आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने पार पाडली जाईल, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांना शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि इतर आवश्यक निकष पूर्ण करावे लागणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून ही भरती प्रक्रिया जाहीर होण्याची चर्चा सुरु होती. पोलीस दलात वाढती पदांची रिक्तता आणि नव्या पिढीतील कुशल, तंदुरुस्त कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन अखेर आज मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे पोलीस दल अधिक बळकट होणार असून तरुणांमध्ये नवी उमेद निर्माण होईल.




