पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रथम राजघाटावर स्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहन पार पडलं. आज स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधताना अनेक मुद्दयांवर भाष्य केलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले, राम जन्मभूमीच्या शतकांहून जुन्या विषयाचं आता शांतिपूर्ण समाधान मिळालंय. देशातील लोकांनी ज्या संयमानं आणि समजूतदारपणे आचरण केलंय ते अभूतपूर्व आहे. ही शांति, एकता आणि सद्भावना भारताच्या उज्ज्वल भविष्याची शाश्वती आहे.
एनसीसीचा विस्तार देशातील १७३ सीमा आणि कोस्टल डिस्ट्रिक्टपर्यंत सुनिश्चित केला जाईल. या अभियानाद्वारे जवळपास १ लाख नवे एनसीसी कॅडेटसला विशेष ट्रेनिंग दिली जाईल. यामध्ये एक तृतियांश सहभाग मुलींचा असेल.
भारताचं सार्वभौमत्व आमच्यासाठी सर्वोच्च आहे. या संकल्पासाठी आपले जवान काय करू शकतात, देश काय करू शकतो हे लडाखमध्ये जगाला पाहायला मिळालं. एलओसीपासून एलएसीपर्यंत देशाच्या सार्वभौमत्वावर ज्या कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं, देशाच्या सेनेनं त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्यूत्तर दिलं.
देशाच्या प्रत्येक गरजवंतापर्यंत कोरोना लस पोहचवण्यासाठी आराखडाही तयार करण्यात आलाय. आज भारतात करोनावर एक नाही, दोन नाही तर तीन लशींची चाचणी सुरू आहे. तज्ज्ञांकडून जेव्हा हिरवा कंदिल मिळेल, तेव्हा या लशीचं उत्पादन मोठ्या संख्येत करण्यावर देशाचा भर असेल.
तुमची प्रत्येक चाचणी, प्रत्येक आजर, कोणत्या डॉक्टरांनी आपल्याला कोणतं औषध दिलं, केव्हा दिलं, रिपोर्टस् काय होते याची सर्व माहिती एका आरोग्य आयडीमध्ये असेल. आजपासून देशात एक मोठ्या अभियानाला सुरुवात होतेय. हे आहे ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’. भारताच्या आरोग्य क्षेत्रात ही योजना मोठी क्रांती घेऊन येईल.
२०१४ पूर्वी देशाच्या केवळ पाच डझन पंचायती ऑप्टिकल फायबरशी जोडल्या गेल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत दीड लाखांहून अधिक ग्राम पंचायती ऑप्टिकल फायबरशी जोडण्यात आल्यात. येणाऱ्या १००० दिवसांत हे लक्ष्य पूर्ण केलं जाईल. देशातील प्रत्येक गावाला ऑप्टिकल फायबरशी जोडलं जाईल.
गेल्या महिन्यातच जवळपास ३ लाख कोटी रुपयांचं ट्रन्झक्शन केवळ BHIM UPI अॅपच्या सहाय्यानं पार पडलं.
आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी, आधुनिक भारत निर्माणासाठी, नवीन भारत घडविण्यात, समृद्ध आणि आनंदी भारत घडविण्यात देशाच्या शिक्षणाला मोठं महत्त्व आहे. या विचारसरणीनंच देशाला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मिळालंय.
‘जल जीवन मिशन’ योजनेची घोषणा गेल्या वर्षी इथंच करण्यात आली होती. आज मला समाधान आहे की एक लाखांहून अधिक घरांत नळाद्वारे पाणी पोहचवलं जातंय. जंगलांत दूर दूर राहणाऱ्या आदिवासींपर्यंत ही योजना पोहचलीय.
७ कोटी गरीब कुटुंबाना मोफत गॅस सिलिंडर पुरवण्यात आलेत. राशनकार्ड असेल किंवा नसेल ८० कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्न व्यवस्था करण्यात आली. बँक खात्यात जवळपास ९० हजार कोटी रुपये थेट ट्रान्सफर करण्यात आले.
जगातील मोठ-मोठ्या कंपन्या आज भारताकडे वळत आहेत. ‘मेक इन इंडिया’सोबत ‘मेक फॉर वर्ल्ड’ मंत्रासोबत पुढे वाटचाल करायला हवी. भारतात परराष्ट्र गुंतवणुकीनं देशातील आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडलेत. भारतात परराष्ट्र गुंतवणुकीत १८ टक्क्यांची वाढ झालीय.
केवळ काही महिन्यांपर्यंत एन ९५ मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटर्स आपण परदेशातून आयात करत होतो. आज या सगळ्या वस्तूंत भारत न केवळ स्वत:च्या गरजा भागवतोय पण इतर देशांनाही मदत पुरवतोय.
आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ आयात कमी करणं नाही तर आपली क्षमता, सर्जनशीलता, कौशल्यही वाढवायचे आहेत.
करोनाच्या या संकटकाळात ‘सेवा परमो धर्मा’ची भावना आपल्यासोबत आहे. आपल्या आयुष्याची पर्वा न करता डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्बुलन्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, संरक्षण व्यवस्था, अनेक लोक २४ तास काम करत आहेत.




