इंदौर : इंदौरमध्ये एका व्यक्तीचा चार्जिंगला जोडलेल्या मोबाईल फोनवर बोलत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना चंदन नगर पोलीस ठाण्यातील विक्रम हाइट्स येथे घडली. सुजीत विश्वकर्मा (वय २५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुजीतचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजीत विश्वकर्मा मुंबईतील नालासोपारा येथील रहिवासी असून तो सुताराचे काम करत होता. सुजीतचा भाऊ संजय याने पोलिसांना सांगितले की, दोघे आठवडाभरापूर्वी शोरूममध्ये फर्निचर बनवण्यासाठी इंदौरला आले होते. ते मंगळवारी मुंबईत परतणार होते. मात्र, सोमवारी रात्री सुजीत जेवण करून त्याच्या खोलीत गेला. त्याने आपला मोबाईल फोन चार्जिंग पॉईंटवर लावला आणि आपल्या पत्नीला कॉल केला. इतक्यात त्याच्या किंचाळण्याचा आवाज आला. त्याचा आवाज ऐकून संजय त्याच्या खोलीत धावला, तेव्हा त्याला तो जमिनीवर पडलेला दिसला. त्यानंतर त्याला तात्काळ एमवाय हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे डॉक्टरांनी सुजीतला मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजीतचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे आहे. संध्याकाळी फर्निचरचं काम पूर्ण झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुजीत मुंबईला जाणार होता. मात्र त्याअगोदरच ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे चंदननगर पोलिसांनी सांगितले.
मोबाईल चार्जिंगला लावून कुणाशी फोनवर बोलत असाल तर सावधान. असा अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्या.




