गुवाहाटी : शेळीने माणसाच्या बाळासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. आसाममधील कछार जिल्ह्यातील धौलाई येथील गंगा नगर गावात ही घटना उघडकीस आली आहे. या पिल्लाचे दोन पाय आणि कान सोडले, तर बाकीचे शरीर माणसांसारखेच होते. मात्र जन्मल्यानंतर या पिल्लाचा मृत्यू झाला. परंतु त्याचे मानवी बाळासारखे साम्य अनेकांना आश्चर्यचकित करत होते.
शेळीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी त्याच्या पाळीव शेळीने माणसाच्या बाळाप्रमाणे दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला. या पिल्लाचा चेहरा लहान मुलासारखा होता आणि त्याला शेपूटही नव्हते. हे पाहून घरातील सर्वांनाच आश्चर्य वाटले. ही बातमी काहीच वेळात संपूर्ण गावात पसरली. गावकऱ्यांनी या पिल्लाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर गावकऱ्यांनी पारंपारिक रितीरिवाजानुसार या पिल्लाला दफन केले.




